
कोल्हापूर, 15 मार्च (हिं.स.)। वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात सेवाभावी आणि अनेकांना जीवनदान देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील उच्च पदवी घेवून आपण डाँक्टर म्हणून बाहेर पडत आहात. जास्तीत जास्त डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात सेवा करावी. आपल्या हातून गरीब आणि सामान्य रुग्णांची सेवा व्हावी यासाठी कटिबद्ध रहा,असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम. डी., एम. एस. या पदव्युत्तर पदव्यांच्या पदवीदान समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शासकीय रुग्णालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण असतात आणि विशेष म्हणजे ते सामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. मुला-मुलींचे वस्तीगृह यासह स्वयंपाक व्यवस्था, अभ्यासिका यामध्ये कोठेही कमतरता भासणार नाही यासाठी दक्ष राहिलो. सामान्य माणसाला उपचाराची गरज पडली तर त्याला खाजगी रुग्णालयात जावं लागू नये यासाठी शासकीय रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आज केवळ एमबीबीएस होवून काहीही उपयोग नाही. पी. जी. होतील तेच टिकणार आहेत. अनेक शासकीय महाविद्यालयांमध्ये लिव्हर, किडनी, हार्ट ट्रान्सफार्म करण्याची सुविधा आहे पण तिथे तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गरिबांच्या सेवेत अडचणी येत आहेत. त्यामुळे आज पदवी घेवून बाहेर पडणार्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात सेवा करावी, अशी अपेक्षाही मंञी श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
आपल्या फँमिली डॉक्टरांनी तुला काहीही होणार नाही, तु बरा होणार असे नुसते सांगितले तरी अनेकांना ५० टक्के बरं वाटायला लागते. तशी लोकप्रियता आणि विश्र्वासहर्ता टिकवावी, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar