
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : संगमेश्वर येथील जाखमाता आणि निनावी देवीचा पारंपरिक ‘शिंपणे’ अर्थात रंगपंचमी उत्सव येत्या बुधवारी, दि. १८ मार्च रोजी साजरा होणार आहे.
संगमेश्वरसह कसबा परिसरात हा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने पार पडत असून सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर बलिदानासाठी योग्य दिवस पाहून ‘शिंपणे’ उत्सव साजरा करण्याची परंपरा संगमेश्वर येथे आहे. त्यामुळे या दिवशी हजारो भाविक संगमेश्वरात एकत्र येऊन देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
या दिवशी दिवसभर लाल रंगाची उधळण करत देवीच्या जयघोषात वातावरण दुमदुमून जाते. भाविक देवीला नवस म्हणून नारळ, कोंबडे व बोकड अर्पण करतात. त्यातून तयार केलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. रात्री मटण-भाकरीच्या प्रसादाने या उत्सवाची सांगता होते. उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हे भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतात.
पारंपरिक संस्कृतीची जपणूक करणारा हा उत्सव असल्याने माहेरवाशिणीही मोठ्या संख्येने गावात येतात आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
उत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष व मानकरी दत्ताराम ऊर्फ बावा सुर्वे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी