लातूर - टायगर ग्रुपच्या पुढाकाराने आज्जी सुखरूप परतल्या घरी
लातूर, 15 मार्च, (हिं.स.)। वय आणि विस्मरणामुळे आपल्या घराचा रस्ता विसरलेल्या एका वृद्ध आजीसाठी अहमदपूरमधील टायगर ग्रुपचे तरुण देवदूत ठरले आहेत. घरापासून भरकटलेल्या हरिबाई गंगाधर इबितवाड या आजींना टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आधार देत,
आज्जी सुखरूप घरी


लातूर, 15 मार्च, (हिं.स.)। वय आणि विस्मरणामुळे आपल्या घराचा रस्ता विसरलेल्या एका वृद्ध आजीसाठी अहमदपूरमधील टायगर ग्रुपचे तरुण देवदूत ठरले आहेत. घरापासून भरकटलेल्या हरिबाई गंगाधर इबितवाड या आजींना टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आधार देत, शोध घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

शहरातील रहिवासी असलेल्या हरिबाई गंगाधर इबितवाड या काही कारणास्तव घराबाहेर पडल्या होत्या, मात्र त्यांना परत जाण्याचा रस्ता सापडत नव्हता. अनोळखी परिसरात हतबल होऊन फिरत असताना त्या आपल्या घरापासून खूप दूर गेल्या होत्या. वय जास्त असल्याने त्यांना स्वतःचा पत्ता सांगतानाही अडचणी येत होत्या.

ही बाब टायगर ग्रुपचे अहमदपूर तालुका अध्यक्ष भागवत पाटील आणि विशाल सर्वदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आजींची विचारपूस केली. सुरुवातीला त्यांना सुरक्षित ठिकाणी बसवून खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यानंतर मोठ्या संयमाने त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या काही पुराव्यांच्या आणि माहितीच्या आधारे टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आजींच्या कुटुंबाचा शोध सुरू केला.

अथक प्रयत्नानंतर आजींच्या नातेवाईकांचा पत्ता लागला. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती हरवल्यामुळे चिंतेत असलेल्या इबितवाड कुटुंबाला जेव्हा आजी सुखरूप असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. टायगर ग्रुपच्या सदस्यांनी आजींना स्वतः नेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

केवळ संघटनात्मक कार्य न करता, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून टायगर ग्रुपने केलेल्या या कार्याचे अहमदपूर शहरात कौतुक होत आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे हीच खरी माणुसकी आहे, अशी भावना यावेळी भागवत पाटील यांनी व्यक्त केली.

या मोहिमेत टायगर ग्रुप परिवारातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या हक्काची व्यक्ती सुखरूप घरी परतल्याने इबितवाड कुटुंबाने टायगर ग्रुपचे डोळे भरून आभार मानले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande