
लातूर, 15 मार्च (हिं.स.) : जनार्दन वाघमारे यांच्या व्यक्तिमत्त्वात विद्वत्ता, तत्त्वनिष्ठा आणि मानवतेचा सुंदर संगम होता. लातूरच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक जीवनाचे ते शिल्पकार होते. त्यांच्या निधनाने जणू एका ज्ञानसूर्याचा अस्त झाला असून समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावपूर्ण उद्गार प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी काढले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) लातूर व समविचारी संघटनांच्या वतीने हॉटेल अंजनी येथे माजी खासदार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू जनार्दन वाघमारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सोमनाथ रोडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रा. सुभाष भिंगे, अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे तसेच प्रा. सुशिला पिंपळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे यांनी स्मृतीशेष जनार्दन वाघमारे यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर श्याम जैन, नरसिंग घोडके, रमेश चिल्ले, शिवाजीराव माडे, रामराजे अत्राम, पांडुरंग देडे, विश्वंभर भोसले, प्रा. अर्जुन जाधव, रुक्साना मुल्ला, डॉ. अशोक नारनवरे, सुपर्ण जगताप, डॉ. गणेश गोमारे, प्रा. दशरथ भिसे, उत्तरेश्वर बिराजदार, के. आर. वाघमारे, सुदाम माळी, बब्रुवान गोमसाळे आदींनी आपल्या मनोगतातून वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis