विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत गिरीश गांधी अध्यक्षपदी विजयी
* टपाली मतदानातून ६५ टक्के मतदान नागपूर, १५ मार्च (हिं.स.) : संपूर्ण विदर्भासह राज्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या गाजलेल्या निवडणुकीत गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्
गिरीश गांधी


* टपाली मतदानातून ६५ टक्के मतदान

नागपूर, १५ मार्च (हिं.स.) : संपूर्ण विदर्भासह राज्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या गाजलेल्या निवडणुकीत गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी तसेच डॉ. रंजन दारव्हेकर हे उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीत अध्यक्षपदासोबत कार्यकारिणीतील २२ सदस्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही निवडणूक अद्यापही टपाली मतदान पद्धतीने घेण्यात आली. एकूण ७४०० मतदारांपैकी सुमारे ४९०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ६५ टक्के इतकी नोंदवली गेली.

मतमोजणीला रविवारी दुपारपासून सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी पहिल्याच फेरीपासून गिरीश गांधी आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना ५६२ मते मिळाली, तर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना १२०, प्रदीप दाते यांना १६१, डॉ. रवींद्र शोभणे यांना ५४ आणि डॉ. रंजन दारव्हेकर यांना १९ मते मिळाली.

दुसऱ्या फेरीत गांधी यांचे मताधिक्य वाढत गेले. त्यांना १८६१ मते मिळाली. त्यानंतर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना ३३६, प्रदीप दाते यांना ५९९, डॉ. रवींद्र शोभणे यांना १२८ आणि डॉ. रंजन दारव्हेकर यांना ६४ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत गांधी यांना २३०८ मते मिळाली, तर जोशी यांना ५५९, दाते यांना ९१८, शोभणे यांना १९१ आणि दारव्हेकर यांना ९६ मते मिळाली.

चौथ्या फेरीअखेर गिरीश गांधी यांना २६६१ मते मिळाली. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना ७०१, प्रदीप दाते यांना ११८७, डॉ. रवींद्र शोभणे यांना २०५ आणि डॉ. रंजन दारव्हेकर यांना ११४ मते मिळाली.

पाच वर्षांचा कार्यकाळ

१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेला ७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. चार पॅनेल्स आणि स्वतंत्र उमेदवार मिळून एकूण ८३ उमेदवार रिंगणात होते. त्यातून कार्यकारिणीतील २२ सदस्यांची निवड करण्यात आली.

विदर्भातील विविध ठिकाणच्या मतदारांकडून मतपत्रिका पोस्टाद्वारे मागविण्यात आल्या. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतपत्रिका पाठविण्याची अंतिम मुदत होती. मतमोजणीसाठी संघाच्या मुख्य दालनात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

राजकीय हस्तक्षेपाचे आरोप

या निवडणुकीदरम्यान राजकीय हस्तक्षेपाचे आरोपही झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाची यंत्रणा निवडणुकीत सक्रिय असल्याचा आक्षेप काही उमेदवारांनी घेतला होता. मात्र गडकरी यांनी या निवडणुकीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच विदर्भ प्रदेश संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यावरही मतपत्रिका गोळा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे आरोप झाले होते. कोठेकर यांनी हे आरोप फेटाळले असले तरी निवडणुकीच्या अखेरपर्यंत राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande