
लातूर, 15 मार्च (हिं.स.)। वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या एलबीएल एक्सपो 2026च्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात क्लिकलिंगायत समाजातील युवकांची छोटीशी बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक संग्राम स्मारक विद्यालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आली होती.
एलबीएल (LBL) ही संस्था वीरशैव लिंगायत समाजातील पुणे शहरात विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांची संघटना असून “एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या तत्त्वावर ही संस्था कार्यरत आहे. समाजातील उद्योजकांना एकमेकांच्या व्यवसायाबाबत मार्गदर्शन मिळावे, परस्पर सहकार्य वाढावे आणि नव्या पिढीला उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संघटना सातत्याने काम करत आहे.
गेल्या सहा वर्षांपूर्वी या संघटनेची स्थापना झाली असून आजपर्यंत या संस्थेचे ७ हजारांहून अधिक सभासद विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. सध्या ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्येही आपला विस्तार करण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
समाजातील युवकांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे आणि उद्योजकतेला चालना मिळावी या उद्देशाने एलबीएल एक्सपो 2026चे आयोजन करण्यात आले आहे. हा एक्सपो पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
या एक्सपोमध्ये पुणे येथे उद्योग-व्यवसायात कार्यरत असलेल्या लिंगायत समाजातील उद्योजकांचे विविध स्टॉल उभारण्यात येणार असून उद्योजकता, नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी मराठवाडा तसेच सीमाभागातील समाजबांधवांच्या भेटीगाठी घेऊन निमंत्रण देण्याचे काम सुरू आहे.
या बैठकीला ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनजी शेटे, डॉ. बाळासाहेब पाटील, तेजस महाजन, लक्ष्मण तोगर्गे यांच्यासह अॅड. रमाकांत चटनाळे, प्रमोद शेटकर, नगरसेवक नागेश अष्टुरे, माजी नगरसेवक साईनाथ चिमेगावे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव माशाळकर, प्रभुराज कपिकेरे, पत्रकार रवींद्र हसरगुंडे, ओम गांजुरे, शिवकुमार उपरबावडे, नागेश पटवारी, पप्पू डांगे, अमित कवठाळे, भालके सर, महेश बोळेगावे, औरादे आप्पा, ओम शेटकार, शिवशंकर सर, विश्वजित बिरादार, राहुल अलापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis