
छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)।
भारतीय लष्करात काम करणे हे स्वाभिमान, आत्मसन्मान व राष्ट्राची सेवा आहे. लष्करी सेवेत अधिकारी होण्यासाठी युवकांनी प्रबळ इच्छाशक्तीला आत्मविश्वासाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनुप बरबरे व मेजर प्रणव शेंडगे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'संरक्षण सेवेतील संधी' या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या नाट्यगृहात संपन्न झाला. यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अनुप जी.बरबरे आणि सेना प्रशिक्षण केंद्र, पंचमढी (मध्यप्रदेश) येथील मेजर प्रणव सुधाकर शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम कुलगुरू कर्नल डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा, नेट सेट, बँकिंग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती असते. मात्र सेनेत सेवेच्या संधी फार माहित नसतात म्हणून सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मेजर प्रणव सुधाकर शेंडगे यांनी 'पॉवर पाँईट पेझेटेंशन'च्या माध्यमातून सादरीकरण करीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतीय सेवेत सैनिकांशिवायही तांत्रिक अन्य सहायक अधिकारी यांची निम्यापेक्षा जास्त पदे आहेत. तथापि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये थेट सेवेत भरती होण्यासाठी सकारात्मकता दिसून येत नाही. विशेषतः राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व अन्य स्पर्धांची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय वयापासूनच आपले ध्येय निश्चित ठेवले पाहिजे. विशेषतः बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए ) व सीडीएस च्या माध्यमातून थेट सेवेत भरती होण्याची तयारी केली पाहिजे. मुलाखतीसाठी लेखन व संवाद कौशल्य, वाचन व उत्तम शरीर ठेवले पाहिजे, असेही मेजर शेंडगे म्हणाले. सेनेतील अधिकारी पदासाठी तब्बल पाच दिवस मुलाखत द्यावी लागते. यासाठी मानसिक क्षमता, स्वयंमुल्यामापन, गट चर्चा, नेतृत्व गुण क्षमता या बाबीची तयारी करावी, असेही मेजर शेंडगे म्हणाले.
भारतीय सेवेत सैनिक अधिका-यांसह तांत्रिक व सपोर्टींग अधिका-यांची हजारो पदे आहेत. मात्र यासाठी युवकांना योग्य मार्ग, उत्तम मार्गदर्शन व कठोर मेहनत हवी, असे ब्रिगेडियर अनुप बरबरे म्हणाले. विशेषतः शालेय वयापासूनच 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांचे वाचन करुन ज्ञान वृध्दींगत केले पाहिजे. वेळ आणि दिशा कधीच चुकता कामा नये. आजकाल स्पर्धा परीक्षा व सेनेसह अधिकारी पदांसाठी पदवीपेक्षाही अधिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असेही बरबरे म्हणाले. सुमारे एका तासाच्या मार्गदर्शनात ब्रिगेडियर यांनी पॉवर पॉईटच्या माध्यमातून अनेक मुद्दे समजून सांगितले. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कुलगुरु कर्नल डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम गेल्या दोन वर्षात राबविण्यात येत असल्याचे डॉ.वाल्मिक सरवदे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis