चिपळूणमध्ये मिनी थिएटर उभारू : पालकमंत्री
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून तेथे लवकरच मिनी थिएटर उभारू, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. चिपळूण पालिका हद्दीतील विविध विकासकामांसह रस्त्यांच्या कामा
चिपळूणमध्ये मिनी थिएटर उभारू : पालकमंत्री


रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून तेथे लवकरच मिनी थिएटर उभारू, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

चिपळूण पालिका हद्दीतील विविध विकासकामांसह रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पेठमाप येथे श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी चिपळूणमध्ये रत्नागिरीप्रमाणे सुमारे २०० आसन क्षमतेचे मिनी थिएटर उभारण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री सामंत यांनी चिपळूणमध्ये मिनी थिएटर उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविकात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, हा कार्यक्रम दोन वेळा पुढे ढकलावा लागला. मात्र शहरासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्र्यांच्याच हस्ते भूमिपूजन व्हावे, हा आमचा आग्रह होता. मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या साहित्यिक सन्मान सोहळ्यासाठीही त्यांची उपस्थिती असावी, अशी पालिकेची इच्छा होती. पालिकेने सादर केलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

चिपळूण शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण व इतर विकासकामांसाठी ५०० कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ जेवढा निधी मागतील तेवढा देऊ, शहराच्या विकासासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही, असेही श्री. सामंत म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande