
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण शहरातील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात पार पडले. या प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील २० शिक्षकांनी घेतला.
प्रशिक्षणासाठी डाएटच्या प्राचार्या नीता कांबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता राहुल बर्वे, अधिव्याख्याता डॉ. लहू आचरेकर तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता अनुपमा तावशीकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतून प्रशिक्षण घेतलेले मार्गदर्शक प्रा. मिलिंद कडवईकर यांनी करिअरचे नियोजन करताना ‘स्व’ची ओळख कशी करून घ्यावी? या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिदशेतच ‘करिअर कार्ड्स’ व ‘माय करिअर अॅडव्हायझर’ अॅप यांची माहिती असणे का आवश्यक आहे, किशोरावस्थेत विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज का भासते, तसेच किशोरवयीन मुलांना समजून घेताना शिक्षकाची भूमिका काय असावी, या विषयांवर त्यांनी आपले समुपदेशनाचे अनुभव मांडले. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व समुपदेशन करताना मानसशास्त्रीय चाचण्यांचा कसा उपयोग होतो याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा व व्यावसायिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना व्हीजीपीजी जिल्हा समन्वयक सीमा इंगळे यांनी व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक सोनल सावंत यांनी व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे काय? हे समजावताना शालेय व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम कसे आयोजित करावेत, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करताना व विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गेटकीपरची भूमिका काय असते, याविषयी माहिती दिली. तसेच विविध कौशल्याधारित उपक्रमांची माहितीही त्यांनी करून दिली.
समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डाएटच्या अधिव्याख्याता सीमा इंगळे म्हणाल्या की, सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करून त्यांचे कौशल्य विकास करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी