
नवी दिल्ली , 16 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी आपल्या सर्व दुबईकडे जाणाऱ्या उड्डाणे रद्द केली आहेत. मात्र, एअर इंडिया एक्सप्रेसची अबू धाबी, रास अल खैमाह आणि शारजाहसाठी नियोजित उड्डाणे पूर्ववत सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
एअर इंडियाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, “दुबईमधील उड्डाण संचालन तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणारी आणि जाणारी सर्व उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. त्यामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दुबईकडे जाणारी व तेथून येणारी आजची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.”
दरम्यान, तिरुवनंतपुरमहून दुबईकडे जाणारे एमिरेट्स एअरलाईन्सचे एक विमान सोमवारी गंतव्य विमानतळावर सुरक्षा संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर परत फिरले. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्यानंतर एमिरेट्सची टीआरव्ही-डीएक्सबी उड्डाण सेवा मध्य मार्गातूनच परत आली. हे विमान पुन्हा तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.या विमानात ३५३ प्रवासी आणि १९ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे विमान पहाटे ४.४० वाजता रवाना झाले होते आणि सकाळी ८.४० वाजता परतले. प्रवाशांना टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी, एमिरेट्सचेच ईके५३३ हे दुसरे उड्डाण पहाटे ४.३० वाजता कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३२५ प्रवाशांना घेऊन दुबईकडे रवाना झाले होते. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अचानक बंद झाल्याने हे विमानही परत फिरले आणि कोची विमानतळावर उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोनशी संबंधित घटनेमुळे आग लागली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. दुबई पोलिसांनी एअरपोर्ट रोड आणि एअरपोर्ट टनेल सध्या बंद असल्याचे सांगितले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरात आपत्कालीन मदत आणि बचावकार्य सुरू असून वाहतूक त्या भागातून वळविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode