काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, वाहतुकीवर परिणाम
श्रीनगर, १६ मार्च (हिं.स.)सोमवारी काश्मीरच्या वरच्या भागात बहुतेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली, तर मैदानी भागात सततच्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार बर्फवृष्टीमुळे सिंथन टॉपवर अनेक वाहने अडकली, ज्यांना रवि
काश्मीर बर्फवृष्टी संग्रहित फोटो


श्रीनगर, १६ मार्च (हिं.स.)सोमवारी काश्मीरच्या वरच्या भागात बहुतेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली, तर मैदानी भागात सततच्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार बर्फवृष्टीमुळे सिंथन टॉपवर अनेक वाहने अडकली, ज्यांना रविवारी रात्री पोलिस आणि सैन्याच्या मदतीने सुरक्षितपणे वाचवण्यात आले, अडकलेल्या २१४ पर्यटक आणि स्थानिकांनाही बाहेर काढण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील दूधपथरी आणि गंदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे बर्फवृष्टी झाली. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील मुघल रोडवरील पीर की गली आणि झोजिला, उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुरेझ, कुपवाडा येथील साधना टॉप आणि अनंतनागला किश्तवारशी जोडणारा सिंथन टॉप यासारख्या उंच डोंगररांगा जोरदार बर्फवृष्टीमुळे प्रभावित झाल्या.

साधना टॉपवर १२ इंचापेक्षा जास्त नवीन बर्फवृष्टी झाली, तर सिंथन टॉपवर सुमारे सहा इंचाची बर्फवृष्टी झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बर्फवृष्टीमुळे खोऱ्यातील गुरेझ-बंदीपोरा रोड, सिंथन-किश्तवार रोड आणि काश्मीर खोऱ्याला जम्मू प्रदेशाशी जोडणारा पर्यायी रस्ता मुघल रोड यासह प्रमुख रस्ते संपर्क तुटले आहेत. झोजिला खिंडीत बर्फ साचल्यामुळे श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

श्रीनगरसह खोऱ्याच्या काही भागात पाऊस पडला आणि सोमवार सकाळपर्यंत अधूनमधून सुरू राहिला. गेल्या २४ तासांत श्रीनगर शहरात १५.९ मिमी पाऊस पडला. पर्यटनस्थळ आणि वार्षिक अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये १५.७ मिमी पाऊस पडला. खराब हवामानामुळे खोऱ्यातील तापमानात घट झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी श्रीनगर शहरातील कमाल तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा सुमारे चार अंशांनी कमी आहे. खोऱ्यातील इतर हवामान केंद्रांवरही तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले गेले. गेल्या काही आठवड्यांपासून खोऱ्यात दिवसाच्या तापमानात असामान्य वाढ होत होत. पण कमी तापमानामुळे या ट्रेंडला ब्रेक लागला आहे.

हवामान खात्याने २० मार्चपर्यंत अनियमित हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार १८ ते २० मार्च दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. २४ ते २५ मार्च रोजी काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वरच्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. विभागाने शेतकऱ्यांना २० मार्चपर्यंत शेतीची कामे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande