
नवी दिल्ली, 16 मार्च (हिं.स.)भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने रविवारी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर एका दिवसात भाजपने केरळ निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ४७ उमेदवारांच्या पहिल्या यादीत मंजेश्वर मतदारसंघातून के. सुरेंद्रन, कोझिकोड उत्तरमधून नव्या हरिदास, कांजीराप्पल्लीमधून अॅडव्होकेट जॉर्ज कुरियन, कझाकूटममधून व्ही. मुरलीधरन आणि नेमोममधून प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.
नव्या हरिदास यांना कोझिकोड उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या या भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आहेत. त्यांनी २०२४ मध्ये केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनी जागा सोडल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती. नव्या यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता.
केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील सर्व १४० विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे