
पालघर, 17 मार्च (हिं.स.)।तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर J-६२ मधील एका कंपनीत मंगळवारी सकाळी LDO (लाईट डिझेल ऑइल) इंधनामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्वलनशील इंधनामुळे आगीने क्षणात विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.सकाळी साडेआठच्या सुमारास लागलेल्या या आगीत बारा ते पंधरा मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या कंपन्यांनाही झळा बसल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त पथकेही पाचारण करण्यात आली आहेत.दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार LDO इंधन साठ्यातून ही आग भडकली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानीची अधिकृत माहिती मिळालेली नाही.प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL