कॅप्टन अशोक खरातच्या सर्व गैरकृत्यांच्या चौकशीची अंनिसची मागणी
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)। - स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा येथील अशोक खरात याला नाशिक गुन्हेशाखा युनिट-1 ने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात बुधवारी (दि. 18) अटक केली.गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून या भोंदू
कॅप्टन अशोक खरातच्या सर्व गैरकृत्यांच्या चौकशीची अंनिसची मागणी


नाशिक, 19 मार्च (हिं.स.)।

- स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा येथील अशोक खरात याला नाशिक गुन्हेशाखा युनिट-1 ने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात बुधवारी (दि. 18) अटक केली.गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर, तसेच इतरत्र बड्या लोकांना भविष्य वर्तविण्याचा बहाणा करून, त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केल्याची महाराष्ट्र अंनिसला दाट शंका होती. म्हणून त्याच्या आजपर्यंतच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंनिसने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिले आहे.प्रतिष्ठित लोक, तसेच बडी राजकीय नेतेमंडळी या भोंदूच्या मागे असल्याने त्यांचे त्याला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे.त्यामुळे त्याने नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एका गावात ज्योतिष सांगण्याचा व विविध कर्मकांड करण्याच्या नावाखाली लोकांचे, विशेषतः महिलांचे शोषण करण्याचा उद्योग वाढविल्याचे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर-2022 मध्ये माजी मुख्यमंत्री, त्यांच्या काही सहकार्यांसह या भोंदूकडे गेल्याचे समजले होते. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसने ही बाब उघड केली होती व निषेध नोंदवला होता. तरीही या भोंदूवर काहीही कारवाई झाली नाही. कॅप्टन खरात याने जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यात राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचे महाराष्ट्र अंनिसचे म्हणणे आहे. या भोंदूकडे 58 व्हिडिओ सापडल्याचेही समजते. त्यात बड्या हस्ती, नेत्यांचाही संबंध असण्याची दाट शंका आहे. त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येण्याची दाट शंका अंनिसने व्यक्त केली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदींच्या सह्या आहेत.

चौकट

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात हा भोंदू आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्या ट्रस्टवर असतील तर सामान्य पीडित महिलेला न्याय कसा मिळेल? शिवाय माजी मुख्यमंत्री व इतर मंत्री त्याचे अंधभक्त असल्याने पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे. पण आम्ही जोरकसपणे पाठपुरावा करू– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande