राम अयोध्येत जन्मले, पण महाराष्ट्रात त्यांनी नामरूप घेतले – रामकथाकार डॉ. भूषण फडके
अकोला, 19 मार्च (हिं.स.)। रामायण ही केवळ जुनी कथा किंवा इतिहास नाही, तर ती मनुष्याला माणूस बनवणारी एक दिशा आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत सगुण रूपात जन्मले असले, तरी महाराष्ट्रातील संतांनी त्यांना ''नामरूपाने'' आपल्या प्रत्येकाच्या हृदयात अजरामर के
Photo


अकोला, 19 मार्च (हिं.स.)।

रामायण ही केवळ जुनी कथा किंवा इतिहास नाही, तर ती मनुष्याला माणूस बनवणारी एक दिशा आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत सगुण रूपात जन्मले असले, तरी महाराष्ट्रातील संतांनी त्यांना 'नामरूपाने' आपल्या प्रत्येकाच्या हृदयात अजरामर केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केले.

निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने जठारपेठ येथील बिर्ला मंदिर येथे आयोजित पाच दिवसीय 'संगीत श्रीरामकथा' महोत्सवाचा श्रीगणेशा बालकांडाच्या निरूपणाने झाला. याप्रसंगी डॉ. फडके यांनी वाल्मीकी रामायणातील प्रसंगांची सांगड वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणीशी घालत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आज श्रीरामजन्म, त्राटिका वध, अहल्या उद्धार, सीता स्वयंवर या घटनांची गुंफण डॉ. फडकेंनी रंजक आणि अभ्यासपूर्ण निरुपणातून केली.

तुकोबांची नामभक्ती आणि ज्ञानेश्वरांचा संयम अयोध्येतील रामजन्माचा आनंद आणि पंढरीच्या वाळवंटातील भक्तीचा खेळ हा एकच आहे, असे सांगत डॉ. फडके यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या 'राम कृष्ण हरी' मंत्राचा महिमा विशद केला. तसेच, दशरथाला मिळालेला 'पुत्रवियोगाचा शाप' कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी जसा सकारात्मकतेने स्वीकारला, तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या निंदेचा राग न धरता 'पसायदान' मागून विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दाखवला, असेही त्यांनी नमूद केले.

संत एकनाथ महाराज आणि भावार्थ रामायण निरूपणादरम्यान डॉ. फडके यांनी संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, नाथांनी 'भावार्थ रामायणातून' रामाचा खरा भाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. विश्वामित्रांनी रामाला दिलेली 'बला' आणि 'अतिबला' ही विद्या म्हणजे केवळ मंत्र नसून ते रामाच्या आत्मबळाचे जागरण होते, असे नाथांनी स्पष्ट केले आहे. शारीरिक सामर्थ्याला जेव्हा आत्मबळाची जोड मिळते, तेव्हाच राष्ट्ररक्षणाचे ध्येय साध्य होते, हा एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रस्तुत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande