नाशिकच्या काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ
नाशिक, 19 मार्च (हिं.स.) : पंचवटी येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सह धर्मादाय उपायुक्त, नाशिक श्री महावीर जोगी, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिक
Vasantika Navratri festival


नाशिक, 19 मार्च (हिं.स.) : पंचवटी येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सह धर्मादाय उपायुक्त, नाशिक श्री महावीर जोगी, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री काळाराम संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती रेखा पांढरे व इतर मान्यवर यांनी दीपप्रज्वलन व श्रीराम प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली.

नववर्षाच्या प्रारंभासोबतच नव्याने गठित विश्वस्त मंडळाने मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी गती देण्याचा स्पष्ट संकल्प यावेळी व्यक्त केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सेवेसाठी मंदिर परिसरात आधुनिक, सुरक्षित व सुव्यवस्थित सुविधा उभारण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.

उद्घाटन सोहळ्यात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. मंदिर परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली सुरू करण्यात आली असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे. रामनाम जप केंद्र व ग्रंथालयाच्या स्थापनेमुळे भक्तांना ध्यान, जप व आध्यात्मिक अध्ययनासाठी स्वतंत्र व शांत वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच मंदिराची माहिती पुस्तिका प्रकाशित करून मंदिराचा इतिहास, परंपरा आणि धार्मिक महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हनुमान सभा मंडपाच्या दगड बदलण्याच्या कामाचा शुभारंभ करून मंदिराच्या स्थापत्य वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या प्रसंगी मंदिरावर प्राचीन परंपरेप्रमाणे धर्मध्वज लावण्यात येणार आहे. हा धर्मध्वज मंदिराच्या आध्यात्मिक गौरव, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार असून भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून माहिती कक्ष, क्लॉक रूम, प्रसाद व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य केंद्र तसेच अन्य सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन अधिक तंत्रज्ञानाधारित आणि सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या कालावधीत अभिषेक, विशेष पूजा, सामूहिक रामरक्षा पठण, प्रवचने, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रामनवमीचा जन्मोत्सव आणि रथयात्रा हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

“नववर्षाच्या प्रारंभासोबतच आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री काळाराम संस्थान भाविकांच्या सेवेसाठी अधिक सक्षम, आधुनिक आणि पारदर्शक व्यवस्थापन उभारण्याच्या दिशेने कार्यरत आहे. परंपरेचे जतन करत विकासाला प्राधान्य देणे हा आमचा मुख्य संकल्प आहे,” असे संस्थानच्या विश्वस्तांनी सांगितले.या प्रसंगी विश्वस्त शांताराम अवसरे, मिलिंद तारे, शुभम मंत्री, अक्षय कलंत्री, अमित कोठावदे, कौशिक कोठिया, राघवेंद्र पुजारी आणि प्रतीक पुजारी उपस्थित होते.श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेले श्री काळाराम मंदिर आता विकास आणि व्यवस्थापनाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असून गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी सुरू झालेला हा महोत्सव पुढील ११ दिवस भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande