
गडचिरोली, 19 मार्च (हिं.स.)माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि अतिदुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आज, १९ मार्च रोजी बंगाडी (ता. भामरागड) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. विशेष म्हणजे, १००० हून अधिक जवान आणि अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने हे केंद्र अवघ्या २४ तासांत उभारून पोलिसांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. सुरक्षेचे कवच आणि विकासाचा मार्ग छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेले हे केंद्र सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सन २०२३ पासून 'सुरक्षा पोकळी' कमी करण्याच्या मोहिमेतील हे ११ वे नवीन केंद्र आहे. या केंद्रामुळे आता या भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल आणि मोबाईल टॉवरच्या कामांना गती मिळणार असून, भविष्यात एस.टी. बस सेवा सुरू करणेही शक्य होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बंगाडी केंद्रात जवानांसाठी पोर्टा कॅबिन, वाय-फाय, आर.ओ. प्लांट आणि विशेष सुरक्षा भिंत (मॅक वॉल) उभारण्यात आली आहे. केंद्राच्या सुरक्षेसाठी सी-६० कमांडो, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जनजागरण मेळाव्याने जिंकली मने उद्घाटनप्रसंगी आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना साड्या, धोतर, भांडी, ब्लँकेट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन केंद्रामुळे नागरिकांपर्यंत सुरक्षा आणि विकास पोहोचवणे आता अधिक सुलभ होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond