रत्नागिरी : देवरूख महाविद्यालयात आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ग्रंथालयाचा नियमित व प्रभावी वापर करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्
आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार


रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ग्रंथालयाचा नियमित व प्रभावी वापर करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम गेली अनेक वर्षे प्रत्येक शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी दिली.

आता संपत असलेल्या शैक्षणिक वर्षातील आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कारप्राप्त शिक्षक व विद्यार्थी असे - शिक्षक गट : प्रा. सुहानी सावंत, विद्यार्थी गट : ऋतुजा रमेश पवार (द्वितीय वर्ष, वाणिज्य), अफान अजमेर धामस्कर (द्वितीय वर्ष, संगणक विज्ञान) आणि किरण चंद्रकांत टक्के (तृतीय वर्ष, वाणिज्य).

या पुरस्कारविजेत्यांनी ग्रंथालयाचा नियमित, शिस्तबद्ध व जिज्ञासेने वापर करून इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथालय सेवांचा नियमित वापर, विविध साहित्यविषयक स्पर्धेतील सहभाग, ग्रंथालय आयोजित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, डिजिटल व मुद्रित साधनांचा योग्य वापर तसेच ग्रंथालय नियमांचे पालन या निकषांचा पुरस्काराकरिता विचार करण्यात आल्याचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी सांगितले.

पुरस्काराच्या स्वरूपात विजेत्या शिक्षक व विद्यार्थ्यांना, पुस्तके, प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. विकास शृंगारे यांनी आपले वडील स्व. प्रभाकर शृंगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके दिली. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील म्हणाले, ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचे केंद्र असून, त्याचा अधिकाधिक उपयोग केल्यास ज्ञानाची व्याप्ती वाढते. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा.

डॉ. वर्षा फाटक यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनामुळे भाषेची समृद्धी, विचारांची स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे स्पष्ट करून, अभ्यासाबरोबरच कायम अवांतर वाचन करण्याविषयी आग्रही मत व्यक्त केले. ग्रंथपाल प्रा. मायंगडे यांनी आभार मानले.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande