
मालेगाव, 19 मार्च (हिं.स.)। शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू असताना महापालिकेला त्याचा खेद वा खंत नसल्याची तक्रार करत अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी महापालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरील खड्डयात गुढी उभारून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले.
एकीकडे अवघा महाराष्ट्र नववर्षाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारून आनंद साजरा करत असताना, मालेगावात मात्र रस्त्यावरील खड्डयांमुळे जनतेचा संताप उफाळून आल्याची दिसले. शहरातील रस्त्यांची झालेली दैना आणि त्यातून रोज घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. याविषयी महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा सूर लावत मराठा महासंघातर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील सटाणा नाका भागात चक्क रस्त्यावरील खड्डयात 'निषेधाची गुढी' उभारण्यात आली.
गेल्या तीन वर्षांत मालेगाव महानगरपालिकेतर्फे रस्ते विकासाच्या नावाने कोटींचे कोटी उड्डाणे घेतली आहेत. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याची ओरड होतं आहे. शिवतीर्थ, मोसमपूल, जुना आग्रा रोड, कॅम्प रोड आणि साठ फुटी रोड यांसारख्या मुख्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी भुयारी गटारींच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यांची डागडुजी अनेक महिने उलटल्यावरही झालेली नाही. या खड्डयांमुळे अनेकदा अपघात घडून निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. या संदर्भात विविध संघटना व नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या गेल्या. मात्र महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV