
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)।
– मराठी नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नविन नाशिक परिसरात “नववर्ष स्वागत यात्रा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करण्यात आली. गुरुवारी सकाळी ७ वाजता विविध भागांतून एकाच वेळी यात्रांचा प्रारंभ झाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.
या यात्रेचा मुख्य उद्देश नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, समाजात एकात्मता निर्माण करणे आणि सर्व समाजघटकांना एकत्र आणणे हा होता. यात्रेमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यात्रेचे खास आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत साकारलेले विविध देखावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्टमंडळ, राम-लक्ष्मण-सीता माता, खंडोबा महाराज तसेच लहान मुलांनी श्रीकृष्ण-राधा यांच्या वेशात सहभाग घेतला होता, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि संस्कृतीमय झाले.
विशेष म्हणजे विविध हास्य क्लबच्या सदस्यांनीही यात्रेत सहभाग घेत सकारात्मकता, आनंद आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला एक वेगळाच उत्साही आणि आनंददायी माहोल लाभला.
खुटवड नगर, पवन नगर, मटाले चौक, आदर्श नगर आणि वनश्री नगर आदी भागांतून सुरू झालेल्या सर्व यात्रा माऊली लॉन्स, डी.जी.पी. नगर-२, कामटवाडे येथे एकत्र येऊन समारोप करण्यात आला.
समारोप प्रसंगी २१ लकी ड्रॉ काढून पैठणी आणि नेकलेस, नथ, रिलायंस ज्वेलर्स कंपनीने दिलेले बक्षिसे देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री. हेमंत राठी, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, महेश हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, कविता नाईक, सुवर्णा मटाले, नगरसेवक शरद फडोळ, दिलिप देवांग आदी उपस्थित होते.
सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार शीतल क्षीरसागर, अशोक फलदेसाई व अनुष्का गीते यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
नववर्ष स्वागत यात्रा समिती (नविन नाशिक परिसर) यांच्या वतीने आयोजित या यात्रेत नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभाग घेत आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV