सांस्कृतिक कार्य विभागाचा गौरवशाली उपक्रम : प्रथम क्रमांकाचा चित्ररथ गिरगावात प्रदर्शनासाठी
* कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई, 19 मार्च (हिं.स.) : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित
चित्ररथ


* कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

मुंबई, 19 मार्च (हिं.स.) : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.

या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे अधोरेखन प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. मा. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande