
सापडली करोडोची माया, अनेक महिलांचे केले लैंगिक शोषण
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)
- अंकशास्त्रावरून ज्योतिषी सांगणारा कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती आली असून राजकीय तसेच अनेक प्रतिष्ठित लोक गुंतले असल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विविध ठिकाणी छापे मारून 200 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आणले आहे दरम्यान अनेक स्त्रियांच लैंगिक शोषण केले असल्याची प्राथमिक माहिती या छाप्यामधून समोर आली आहे पोलीस लवकरच पुढील कारवाई करणार आहे.
अनेक राजकीय नेते कलावंत आणि अधिकाऱ्यांना अंकशास्त्रावरून आपले भविष्य सांगणाऱ्या कॅप्टन अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यावर अधिक गतिमान पद्धतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये अनेक राजकीय नेते तसेच प्रतिष्ठित नागरिक अडकल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे तेजस्विनी सातपुते या महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत एसआयटी सर्व चौकशी करणार असून यामुळे आता अधिक काही माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरातने लष्करी शिस्त आणि अंकशास्त्राच्या नावाखाली राजकीय नेते मंडळींसह प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठांचे भविष्य सांगून गेल्या काही वर्षांत सुमारे २०० कोटींची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. यात नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील एक अलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर परिसरात ऑफिस, पाथर्डी परिसरात कोट्यावधींची ३० एकर जमीन आणि सिन्नर, ओझर विमानतळ परिसरासह शिर्डीतील कोट्यवधींच्या जमिनीचा समावेश आहे
दरम्यान, अशोक खरातच्या सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची नाशिक पोलिसांकडून रात्री तपासणी करण्यात आली. याशिवाय मिरगावतील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयाची देखील झाडाझडती घेण्यात आली. यावेळी तेथील स्थानिकांनी मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा राबता असायचा अशी माहिती पोलीसांना दिल्याचे समजते.
कुठे किती संपत्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातची पाथर्डीत सर्व्हे क्रमांक ३३, ९३, ९७, १३२, १३८, २०३, २२०, मध्ये ३० एकर जमीन असून, याची किंमत अंदाजे १५० कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते. याशिवाय गौळणे शिवारात त्याने पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्तबालाच्या नावे ३० कोटींच्या जमीनीचे खरेदी खत केल्याचे समजते. तर कहांडळवाडी, मीरगाव येथे ४५ एकर जमीन असून याची किंमत साधारणता दोन कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे. तसेच मीरगाव येथील मंदिराच्या मागे असलेल्या त्याच्या भव्य फार्महाऊसची किंमत सुमारे १० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. त्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास आहे. तर ओझर विमानतळाजवळ पाच कोटींची जमीन असून, शहरातील कर्मयोगीनगरच्या आलिशान बंगल्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. तर कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसची किंमत १ कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या सर्व संपत्तीची किंमत सुमारे २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV