
अमरावती, 19 मार्च (हिं.स.)। आधीच दुसऱ्याला विकलेल्या शेताची पुन्हा विक्री व्यवहार करून दुसऱ्याला ईसारचिठ्ठी करून तब्बल ११ लाख ६२ हजारांनी त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. चांदूररेल्वे पोलिसांनी याप्रकरणात संशयित दारासिंग गोविंदा चव्हाण, संतोष राठोड, निरंजन राठोड व एक महिला, अशा चौघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्यात कुणालाही अटक करण्यात आली नाही. शीतल देवीप्रसाद औगड (वय ४०), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे चांदूररेल्वे पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी ३१ जानेवारी ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा व्यवहार संशयितांनी केला. संशयित चौघांच्या मालकीची शेती त्यांनी आधीच विकली असल्याची बाब शीतल औगड यांच्यापासून लपवून ठेवून त्यांना धोका देऊन इसारचिठ्ठी करून घेतली. शीतल यांच्याकडून वेगवेगळ्या धनादेशाच्या माध्यमातून एकूण ११ लाख रुपये घेतले आहेत. संशयित दारासिंग गोविंदा चव्हाण यांनी मूळ मालकासोबत हातमिळवणी करून धोकाधडीने शीतल औगड यांच्याशी शेत विक्रीचा व्यवहार केल्यापोटी त्यांच्याकडून ६५ हजार रुपये दलालीही घेतली. चौघांनी विश्वासघात करून आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शीतल औगड यांनी तक्रारीत केला. त्या आधारे चांदूररेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी