
जळगाव, 18 मार्च (हिं.स.) जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळच्या जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने शेतकरी आणि बैल जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर परिसरात मोठा संताप उसळला. संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. रास्ता रोकोमुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे, परीक्षेसाठी निघालेले अनेक विद्यार्थी या कोंडीत अडकले, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर