
लातूर, 19 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत शेतजमिनीचा गैरवापर करून गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार, मौजे गोंदेगाव, ता. जि. लातूर येथील इसम राजकुमार छत्रभुज देशमुख (वय ५६ वर्षे) हा स्वतःच्या शेतात उसाच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड करत असल्याचे निदर्शनास आले. सदर माहितीची तात्काळ पडताळणी करून मा. पोलीस अधीक्षक, अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात छापेमारीचे नियोजन करण्यात आले.
पोलीस पथकाने गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक १३२ मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता उसाच्या पिकामध्ये लपवून लागवड केलेली एकूण १०८ गांजाची झाडे आढळून आली. आरोपी राजकुमार देशमुख याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर गांजाची झाडे पंचासमक्ष मुळासकट उपटून पोत्यांमध्ये भरून त्यांचे वजन करण्यात आले. एकूण वजन ३४ किलो ८०५ ग्रॅम इतके असून त्याची अंदाजे किंमत रुपये ५,२२,०७५/- इतकी असून ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
या धडक कारवाईत वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथक प्रमुख म्हणून नेतृत्व केले. त्यांच्या सोबत कारवाईदरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी महसूल व इतर शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख,पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सफौ सर्जेराव जगताप तसेच पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे व पाराजी पुटेवाड, प्रदीप चोपणे ,संतोष खांडेकर, शासकीय व्हिडिओग्राफर सुहास जाधव तसेच वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक टी. टी. टेकाळे, कृषी विभागाचे शासकीय पंच राहुल अंधारे व दिलीप पोतदार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. संपूर्ण कारवाई व्हिडिओग्राफीद्वारे नोंदविण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(क) अन्वये पोलीस ठाणे गातेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis