
कोल्हापूर, 19 मार्च (हिं.स.)। लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्व आणि लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. स्व. अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापौर रूपाराणी निकम यांचेसह शिवाजी विद्यापीठ जवळील के एस बी पी चौकातील जागेची पाहणी करून जागा निश्चित केली.
यावेळी बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले की स्व. अजितदादा यांचे कोल्हापूरात शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्य होते. त्यावेळच्या त्यांच्या काही खास आठवणी आहेत. तसेच कोल्हापूरशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भरभरून विकास निधी दिला आहे. कोल्हापूरच्या प्रवेश मार्गांवर त्यांचे अतिशय सुंदर भव्य स्मारक होईल. त्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून चांगले काम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापौर रूपाराणी निकम यांनी स्व. अजितदादा यांच्या स्मारकाच्या कामात महापालिकेकडून कसलीही कसूर होणार नाही असे सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, भाजपाचे गटनेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दिंडे, नगर रचनाकार रमेश मस्कर आदी प्रमुखांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar