लातूर - औसा मार्गावर भरधाव कार २० फूट खोल खड्डयात कोसळली
लातूर, 19 मार्च (हिं.स.)। लातूर महामार्गावर बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. लातूरकडे जाणाऱ्या एका भरधाव डिझायर कारने विद्युत खांबाला जोराची धडक देऊन २० फूट खोल खड्डयात कोसळली. यावेळी कारने दोन तीन कोलांट्या खाल्ल्या.
अपघात


लातूर, 19 मार्च (हिं.स.)।

लातूर महामार्गावर बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. लातूरकडे जाणाऱ्या एका भरधाव डिझायर कारने विद्युत खांबाला जोराची धडक देऊन २० फूट खोल खड्डयात कोसळली. यावेळी कारने दोन तीन कोलांट्या खाल्ल्या. या भीषण अपघातात कारचा पूर्णतः चक्काचूर झाला असून, कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,

भरधाव कार (एम.एच. २४ वाय ०७०६) सुमारास औशाहुन लातूरच्या दिशेने अतिवेगाने जात होती. दरम्यान, शिंदे पेट्रोल पंपानजीक पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर जोराने आदळली. धडक इतकी भीषण होती की, लोखंडी खांब मधूनच वाकला आहे. त्यानंतर कार बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि अपघात झाला . भीषण अपघाताचा आवाज ऐकताच तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा चक्काचूर झाल्याने जखमी आत अडकून पडले होते. या तरुणांनी जीवाची पर्वा न करता, औसा पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने लातूरला उपचारासाठी हलवले. मदतकार्यात अँड. मजहर शेख, अझहर नांदुर्गे, रिजवान सिध्दीकी, मुना चाऊस यांच्यासह पोलिस कर्मचारी बाबुराव इनकोरे, मदार बोपले आणि भागवत गोमारे यांनी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande