ठाणे - घोडबंदर रोड वरील वाहतूक कोंडीला टायर पंचर वाले जबाबदार ?
ठाणे, 19 मार्च, (हिं.स.)। ठाणे घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीमागील एक धक्कादायक आणि दुर्लक्षित कारण समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून व्यवसाय करणाऱ्या टायर पंचर दुरुस्ती करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्यामुळे वाहनचाल
Thane


ठाणे, 19 मार्च, (हिं.स.)। ठाणे घोडबंदर रोडवरील वाढत्या वाहतूक कोंडीमागील एक धक्कादायक आणि दुर्लक्षित कारण समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून व्यवसाय करणाऱ्या टायर पंचर दुरुस्ती करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणे केल्यास, घोडबंदर रोडच्या विविध ठिकाणी टायर पंचर दुरुस्ती करणारे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला आपली साधने, ट्यूब आणि इतर साहित्य पसरवून बसलेले दिसतात. विशेष म्हणजे, काही ठिकाणी हे अतिक्रमण रस्त्याच्या कडेला मर्यादित न राहता तब्बल 10 ते 12 फूट आतपर्यंत वाढलेले आहे. बांबू किंवा काठ्यांच्या सहाय्याने ट्यूब लावून ठेवण्याची पद्धत अवलंबली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी होत आहे. या अतिक्रमणामुळे आधीच रहदारीने गजबजलेल्या घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी अधिक तीव्र होत आहे. वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघातांचा धोका देखील वाढला आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या समस्येची तीव्रता अधिक जाणवते. स्थानिक वाहनचालकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. “रस्त्यावर आधीच मोठ्या प्रमाणात वाहने असतात, त्यात अशा प्रकारचे अतिक्रमण झाल्यामुळे आमचा प्रवास अधिकच त्रासदायक होतो,” अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिली. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीसांच्या वाहतूक शाखेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का ? या आणि ठाणे मनपा व ठाणे शहर पोलीस संयुक्त कारवाई करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande