ठाणे - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न साकार
ठाणे, 19 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील पत्रकारांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पत्रकारांना म्हाडाची हक्काची घरकुले मिळाली असून या उपक्रमाचे प्रमुख श्रेय ठाणे जिल्हा
Thane


ठाणे, 19 मार्च (हिं.स.)।

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील पत्रकारांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पत्रकारांना म्हाडाची हक्काची घरकुले मिळाली असून या उपक्रमाचे प्रमुख श्रेय ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत ठाणे शहर नियोजन समितीत त्यांच्या सहभागाचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कोलशेत येथील संजीव आशर इमारतीतील ५३ घरांच्या लॉटरीत ४२ अर्जदार पात्र ठरले होते. यापैकी संपूर्ण रक्कम भरलेल्या पत्रकारांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरांच्या किल्ल्या देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार संजय पितळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून म्हाडा प्राधिकरणाकडून किल्ल्या व ताबापत्र मिळवले. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बुधवारी (ता.१८ मार्च) आयोजित कार्यक्रमात पात्र पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना म्हाडा घरांच्या किल्ल्या व अंतिम ताबापत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला हा कार्यक्रम पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

शिवसेना गटनेते पवन कदम यांनी, संजय पितळे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “ केवळ पत्रकारांच्या नव्हे तर सर्वसामान्यांच्या घरकुलांसाठीही त्यांनी जिद्दीने लढा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळासोबतच संजय पितळे यांच्या प्रयत्नांमुळेच पत्रकारांच्या घरकुलांचा हा प्रकल्प साकार झाला आहे. तेव्हा, भविष्यात मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहराच्या विकासाच्या नियोजन समितीत संजय पितळे यांचाही समावेश व्हावा,” अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली.

त्यावर बोलताना महापौर शर्मिला पिंपळोलकर म्हणाल्या की, “पत्रकारांसाठी संजय पितळे हे आज खऱ्या अर्थाने दुवा ठरले आहेत. म्हाडाच्या कागदपत्रांची पूर्तता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत त्यांनी पत्रकारांना हक्काचे घर मिळवून दिले. हा खरोखरच भाग्याचा क्षण आहे. शहर विकासासाठी अशा व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना शहर नियोजन समितीत सहभागी करण्याचा नक्कीच विचार केला जाईल.” असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक मनोज सानप, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तुषार राजे, नारायण शेट्टी, श्रीकांत खाडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे आनंद कांबळे, दिलीप शिंदे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी तसेच महापालिकेच्या उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ठाण्यातील पत्रकारांचे घराचे स्वप्न साकार झाले असून पत्रकार संघटनेची एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी ठरल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande