
मुंबई, 19 मार्च (हिं.स.)।
: मुंबईतील ब्रिटिशकालीन चार हजार स्टॉल धारकांना फेरीवाले ठरवणारा प्रस्ताव महापालिकेने आणला आहे. या स्टॉल धारकांना संबंधित योजना राबवून त्यांना संरक्षित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.
मुंबई महापालिका हद्दीत ब्रिटिशांच्या काळापासून असलेले सुमारे चार हजार स्टॉलधारक आजवर सर्व प्रकारचे शुल्क भरून व्यवसाय करत आले आहेत. या स्टॉल धारकांना फेरीवाले ठरवणारा प्रस्ताव मुंबई महापालिकेने आणला असून परवाना हस्तांतरण आणि खरेदी-विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबे उदरनिर्वाह करत असून महापालिकेच्या या निर्णयामुळे या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आदर्श बीएमसी स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियनमार्फत २५ वर्षे लढा देण्यात येत असल्याचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुंबई महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची दोनवेळा बैठक घेऊन स्टॉल धारकांची बाजू मांडली होती, मात्र अद्याप त्यांना संरक्षित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्टॉलधारक आणि फेरीवाले यांची वेगवेगळी व्याख्या असून स्टॉल धारकांना फेरीवाले ठरवण्याचा निर्णय हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणणारा आहे. या स्टॉल धारकांकडून उचित शुल्क घेऊन त्या-त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच त्यांना संरक्षित करावे, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर