
लातूर, 19 मार्च (हिं.स.)। परिस्थितीवर रडण्यापेक्षा, परिस्थितीशी दोन हात केल्यास यश नक्कीच मिळते, हे औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील सदानंद गोरख नेटके या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रसंगी मजुरी आणि ड्रायव्हर म्हणून काम करत सदानंदने पोलीस भरतीत यश संपादन केले असून, त्याची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांच्या वतीने त्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
शेती आणि संघर्षाचा वारसा.
सदानंदचे कुटुंब अत्यंत सामान्य आहे. त्याचे वडील गोरख नेटके हे सुरुवातीला मुंबईत वाळूच्या टिप्परवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. नंतर गावी येऊन त्यांनी आपल्या दोन-अडीच एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. घरची आर्थिक ओढाताण जवळून पाहिलेल्या सदानंदने शिक्षणासोबतच कुटुंबाला हातभार लावण्याचे ठरवले.
प्रवास: मजुरी ते वर्दीपर्यंत सदानंदचे प्राथमिक शिक्षण तपसे चिंचोलीत, तर महाविद्यालयीन शिक्षण औसा, लातूर आणि धाराशिव येथे पूर्ण झाले. या काळात त्याने अभ्यासाचा कोणताही खंड पडू दिला नाही. घरच्या परिस्थितीमुळे त्याने कधीही हार मानली नाही. खासगी कंपन्यांमध्ये काम केले. शेतात रोजंदारीवर मजुरी केली. कुटुंबाच्या मदतीसाठी दूध टेम्पो आणि ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणूनही काम केले.
अपयशातून घेतली यशाची भरारी.
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सदानंदने अनेक प्रयत्न केले. यापूर्वी दोन वेळा पोलीस भरतीत त्याला अपयश आले. तसेच 'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस' (ITBP) साठी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे त्याने शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे लेखी परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. मात्र, या अपयशाने खचून न जाता त्याने २०२६ च्या नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत अहोरात्र मेहनत घेतली आणि अखेर यशाला गवसणी घातली.
गावात जंगी मिरवणूक आणि सत्कार.
सदानंदच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी १८ मार्च रोजी तपसे चिंचोली ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शेतकऱ्याचा मुलगा पोलीस झाला या अभिमानाने गावकऱ्यांनी त्याचा नागरी सत्कार केला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण आणि त्याचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिस्थिती संघर्ष करायला शिकवते आणि कष्टाची भाकरी नवनवीन अनुभव देते. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले याचे समाधान मोठे आहे.
— सदानंद नेटके (नवनियुक्त पोलीस शिपाई)
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis