
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)।
श्री सप्तश्रृंगी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा वणी गड, ता. कळवण येथे दि. 26 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त गडावर येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी (मालेगाव) देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (कळवण) कश्मिरा संखे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार (कळवण) रोहिदास वारूळे, कळवण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी वंदना सोनवणे, उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता रोहिणी वसावे, भारत संचार निगम लिमिटेडचे निखिल शिरसाठ, महावितरणचे योगेश जगदाळे, सप्तश्रृंगी निवासिनी ट्रस्टचे प्र. व्यवस्थापक संजय नेरकर, ॲड. ललित निकम हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडावर व पायथ्याशी वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे व रुग्णवाहिका सेवा २४ तास सज्ज ठेवावी. अग्निशमन दल, पोलीस, होमगार्ड तसेच स्वयंसेवक यांचे संयुक्त पथक सतत कार्यरत राहील, याचे नियोजन करावे. गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग, रांग व्यवस्थापन व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत केंद्र सुरू ठेवावे. यात्रेदरम्यान भाविकांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता व वीजपुरवठा यांची योग्य व्यवस्था सुनिश्चित करावी. तसेच स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक, व्हीलचेअर, रॅम्प आदी सुविधांची उपलब्धता ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने नियंत्रण काटेकोर ठेवावे. वाहतूक व्यवस्थेनुसार खाजगी वाहनांना गडावर प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून नांदुरी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. बसेससाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. वैद्यकीय सेवेसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व आपत्कालीन खाटांची व्यवस्था सज्ज ठेवावी. यात्रा मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. शासकीय वाहनांसाठी पासेस उपलब्ध करून देत जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला त्यांची यादी सादर करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देत संभाव्य आपत्तीच्या दृष्टीने यात्रेपूर्वी आवश्यक ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या.
यात्रेच्या ठिकाणी एकाच वेळी गडावर जाण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्गांची व्यवस्था ठेवावी. आपत्ती काळात टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण यांनी दिल्या.
यात्राकाळात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोली व्यवस्था गडावर, मध्यवर्ती ठिकाणी व पायथ्याशी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ट्रस्टमार्फत करण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी सूचित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV