रत्नागिरी : पोलीस पाटलांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याची मागणी
रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षापर्यंत वाढविण्याचा अभिप्राय पाठविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांना हे
पोलीस पाटील संघटनेचे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन


रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षापर्यंत वाढविण्याचा अभिप्राय पाठविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांना हे निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्य खजिनदार विश्वनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र कोटकर, उपाध्यक्ष नीलेश ठीक, खजिनदार संतोष सकपाळ, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत थुळ, सहसचिव श्रीराम बेदरकर, जिल्हा महिला संघटक सौ. रोशनी खडपे, जिल्हा महिला प्रतिनिधी शलाका सावंतदेसाई, रत्नागिरी ग्रामीण अध्यक्ष अमेय वेल्हाळ, उपाध्यक्ष संतोष नागवेकर, सचिव सौ. प्रिया बंदरकर, खजिनदार संजू सावंत, शहर अध्यक्ष रजनीकांत पंडये आदी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षापर्यंत वाढवावे ही मागणी प्रलंबित आहे. पोलीस पाटील पदाच्या नियुक्तीकरिता पात्रतेच्या वयाची अट 25 ते 45 वर्षे अशी आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना यामध्ये संधी मिळते परंतु 45 व्या वर्षी पोलीस पाटील झालेला तरुण केवळ पंधरा वर्षांनंतर निवृत्त होतो. त्यामुळे पुढील काळात अर्थार्जनाचे कोणतेही साधन उपलब्ध होत नाही. निवृत्तीचे वय 5 वर्षांनी वाढविल्यास त्यांच्या अनुभवाचा उपयोग गावाला व शासनाला होईल. शिवाय त्यांचा आर्थिकदृष्ट्या फायदा पोलीस पाटलांना होईल. शासनाच्या तिजोरीवर अधिकचा अर्थभारसुद्धा पडणार नाही. मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे. पोलीस पाटीलसुद्धा वयाच्या 65 वर्षापर्यंत अनुभवाच्या आधारे सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतात.

31 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे पोलीस पाटील राज्यस्तरीय मेळाव्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्तीचे वय 60 वरून 65 करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने गेल्या 9 मार्च रोजी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी व गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील, उपाध्यक्ष अरुण बोडके पाटील आणि अन्य प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी अन्य मागण्यांसमवेत प्राधान्याने या मागणीवर चर्चा होऊन ती मान्य करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हा अधीक्षकांकडून अभिप्राय मागविण्यात येणार असून शासन त्यावर योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन देण्यात आले आहे. यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चांगला अभिप्राय देण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande