
अमरावती, 21 मार्च (हिं.स.) | अमरावती शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेतील गंभीर अनियमितता समोर आली आहे. कंपन्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता असल्याचा दावा करत असल्या तरी प्रत्यक्षात काही गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या नावाचा वापर करून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. गोसावी कॉलनी परिसरातील एका ग्राहकाच्या नावावर त्यांनी कोणतेही बुकिंग न करता सिलिंडरची नोंद करून ते दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित ग्राहकाने सांगितले की, त्यांनी घरगुती गॅस सिलिंडरची कोणतीही मागणी नोंदवलेली नव्हती. मात्र अचानक त्यांच्या मोबाईलवर सिलिंडर बुक झाल्याचा संदेश आला. काही वेळातच सिलिंडर ‘डिलिव्हर’ झाल्याचा मेसेजही प्राप्त झाला. प्रत्यक्षात त्यांना कोणतेही सिलिंडर मिळाले नसल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांच्या नावावरून सिलिंडर नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संदर्भात संबंधित गॅस एजन्सीकडे जाब विचारण्यासाठी ग्राहक गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे. “हे बुकिंग कंपनीकडून ऑटोमॅटिक होते. तुम्हाला जेव्हा सिलिंडर लागेल तेव्हा येथे या, आम्ही पावती देऊ आणि तुम्ही गोडाऊनवरून सिलिंडर घेऊन जा,” असे सांगण्यात आल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.ग्राहकाच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय त्यांच्या नावावर सिलिंडरची नोंद करणे हा गंभीर प्रकार मानला जात आहे. यामागे शासकीय सबसिडीचा गैरवापर किंवा सिलिंडरचा काळाबाजार करण्याचा प्रकार तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी