
अमरावती, 21 मार्च (हिं.स.) | अमरावती शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान, जुना कब्रस्तानतसेच विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करून देशात शांतता, बंधुता व समृद्धीसाठी प्रार्थना केली.आज सकाळी सुमारे ८.४५ वाजता मौलाना सईद अख्तर मुरादाबादी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. या वेळी अंदाजे २५ ते ३० हजार मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा केली. तर शहरातील फ्रेजरपुरा परिसरात हि हजारो मस्लिम बांधवानी ईद ची नमाज अदा केली. नमाजनंतर एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. विशेषतः लहान मुलांमध्ये ईदचा उत्साह पाहायला मिळाला.ईदच्या पार्श्वभूमीवर बडनेरासह शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. कपडे, सुका मेवा, अत्तर तसेच शिरखुरम्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकाने गजबजून गेली होती.
दरम्यान, सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची विशेष नजर होती. त्यामुळे ईदचा सण अमरावतीत शांततेत आणि आनंदात पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी