'स्वामी' नामाचा गजर; प्रकट दिनानिमित्त गर्दी महाप्रसाद आणि पालखी सोहळ्याने रंगला उत्सव
बीड, 21 मार्च (हिं.स.)।बीड येथील भाग्यनगर भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवारी बीड शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साज
'स्वामी' नामाचा गजर; प्रकट दिनानिमित्त गर्दी महाप्रसाद आणि पालखी सोहळ्याने रंगला उत्सव


बीड, 21 मार्च (हिं.स.)।बीड येथील भाग्यनगर भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवारी बीड शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सहयोगनगर आणि भाग्यनगर येथील स्वामी समर्थ केंद्रांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता.

उत्सवाची सुरवात पहाटे मंगलमय वातावरणात काकड आरतीने झाली. त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेला विधिवत अभिषेक, पंचामृत स्नान आणि षोड्शोपचार पूजन करण्यात आले. भाविकांनी रांगा लावून स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दिवसभर केंद्रांमध्ये स्वामी चरित्र पारायण, सामूहिक नामजप आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणात सहभाग नोंदवला.

भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेतला. स्वयंसेवकांनी केलेल्या चोख नियोजनामुळे गर्दी असूनही भाविकांना सुलभ दर्शन आणि प्रसाद मिळाला. सायंकाळी धुपारतीनंतर निघालेल्या पालखी सोहळ्याने उत्सवाची उंची गाठली. फुलांनी सजवलेली पालखी आणि भक्तांचा टाळ-मृदंगाच्या गजरातील नाच यामुळे वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. प्रकट दिनानिमित्त दोन्ही केंद्रांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची देखणी आरास करण्यात आली होती. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून स्वामींच्या सेवा या शिकवणीचा जागर करण्यात आला. महाआरतीने या सोहळ्याची सांगता झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande