
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : जागतिक जल दिनानिमित्ताने रविवारी, दि. २२ मार्च रोजी दापोलीच्या निवेदिता प्रतिष्ठानतर्फे जलपूजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गोड्या पाण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जलदिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधूनच रविवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. जालगाव येथील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे स्मारकात हा कार्यक्रम होईल. शुद्ध पाण्याचा कलश श्रीक्षेत्र केशवराज येथून आणण्यात येणार असून या शुद्ध निर्मळ पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे.
वाढते जलसंकट, प्रदूषण आणि पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी या निमित्ताने सद्यःस्थितीत पाण्याची स्थिती दर्शवणारे डिजिटल प्रदर्शन आणि परंपरांची ओळख करून देणारे पुराणवस्तुप्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे.
जलपूजनाच्या या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि पाण्याबाबतची सद्यःस्थिती जाणून घ्यावी. असे आवाहन निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे आणि संयोजन समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी