उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू
लातूर, 21 मार्च (हिं.स.)। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेता, धनेगाव येथील मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्
मांजरा धरण


लातूर, 21 मार्च (हिं.स.)।

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेता, धनेगाव येथील मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांतून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले असून, यामुळे तीन जिल्ह्यांतील ऊस व उन्हाळी पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

मांजरा धरणात सध्या १९३.९८४ दलघमी एकूण पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा १३५.७२६ दलघमी (७४.३७ टक्के) इतका आहे. धरणातून पुढील १५ दिवस पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांनी दिली.

१८ हजार हेक्टरला मिळणार जीवदान

डावा कालवा (९० किमी) : रेणापूर (५९०२ हेक्टर), अंबाजोगाई (३७७६ हेक्टर) आणि केज (९४१ हेक्टर) तालुक्यातील शेतीला लाभ होईल.

उजवा कालवा (७८ किमी) : लातूर (६९७७ हेक्टर) आणि कळंब (६८२ हेक्टर) तालुक्यातील क्षेत्राला पाणी मिळणार आहे.

नदी पात्रातील विसर्ग अद्याप अनिश्चित

कालव्यांतून पाणी सुटले असले तरी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप पाणीपट्टी भरलेली नाही. तसेच त्यांची मागणी नसल्याने धरणाच्या मुख्य दरवाज्यातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन अद्याप ठरलेले नाही. यासंदर्भात लातूर पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अनुप गिरी यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande