
नाशिक, 21 मार्च (हिं.स.) : नाशिकमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांवरून भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रकरण सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करत असून, संबंधित संस्थांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला. चाकणकर यांचे नाव खरात प्रकरणात ठळकपणे समोर आले. राज्यातील राजकीय नेते आणि प्रशासकीय मंडळी यावर टिप्पणी करत आहेत. राज्याचे अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे सांगितले की, भोंदू खरात प्रकरणाबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जावे, असे सांगितले होते, पण आपण तेथे गेलो नाही. तर आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या की, मा.मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांना विनंती आहे की, फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे पुरेसे नाही. या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. प्रकरण अत्यंत गंभीर आहे, आणि पुढे आणखी काही बाबी बाहेर येऊ शकतात असे खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
तर भाजप आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणात भाजपची भूमिका स्पष्ट आहे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालणार नाही. एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरु असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही फरांदे यांनी दिली आहे. तर छत्रपती संभाजी राजेंनी महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू खरातला कॅप्टन म्हणून संबोधू नये असे आवाहन केले आहे. स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय वातावरणात खरात प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे. विरोधकांनी सरकारी चौकशी आणि जनहितासाठी तपास मागितला आहे, तर सत्ताधारी पक्ष आणि समर्थकांनी राजकीय हेतूने या प्रकरणाचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. आता प्रकरणाची न्यायिक आणि तपासाची पुढील प्रक्रिया सुरु आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी