यवतमाळजवळ मिनिबसला भीषण आग; १७ प्रवासी थोडक्यात बचावले
यवतमाळ, 21 मार्च (हिं.स.) : वर्धा येथून नांदेडकडे निघालेल्या हॅप्पी क्लबच्या मिनिबसला यवतमाळ शहरालगत अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व १७ प्रवाशांनी वेळेत बसमधून बाहेर पडत जीवितहानी टळली. यासंदर्भाती
अपघात लोगो


यवतमाळ, 21 मार्च (हिं.स.) : वर्धा येथून नांदेडकडे निघालेल्या हॅप्पी क्लबच्या मिनिबसला यवतमाळ शहरालगत अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व १७ प्रवाशांनी वेळेत बसमधून बाहेर पडत जीवितहानी टळली.

यासंदर्भातील माहितीनुसार, एमएच २७- ००५९ क्रमांकाची मिनिबस शनिवारी दुपारी सुमारे 2 वाजता जवाहरलाल दर्डा विमानतळाजवळून जात असताना जळल्याचा वास येऊ लागला. यावेळी चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बोनट उघडून पाहिले असता रबरी पाईप जळत असल्याचे दिसून आले. चालक पाणी आणण्यासाठी जवळील हॉटेलकडे गेला असताना काही क्षणांतच संपूर्ण मिनिबसने पेट घेतला. चालक आणि सर्व प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ते येईपर्यंत संपूर्ण मिनिबस जळून खाक झाली होती. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही वेळातच वाहन पूर्णपणे जळून गेले.या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande