
महापौर, उपमहापौरांनी दिल्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा
नाशिक, 21 मार्च, (हिं.स.)। मुस्लीम बांधवांचा रमजान ईदनिमित्त काल चंद्रदर्शन झाल्याने आज सकाळी गोल्फ क्लब मैदान येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांनी नमाज अदा केली. त्यानंतर समाजबांधवांना उद्देशून मनोगत व्यक्त केले. नमाज पठणानंतर शहर-ए-खतीब यांनी भारत शांततेच्या मार्गाने प्रगती करेल, यासाठी प्रार्थना केली. नमाज पठणानंतर शुभेच्छा देण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, रंजन ठाकरे, डॉ. सुभाष देवरे, बबलू खैरे, डॉ. हेमलता पाटील, योगेश कमोद आदींसह हिंदू बांधवांनी मुस्लीम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गोल्फ क्लब मैदान अपुरे पडल्यामुळे अनेक मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर बसून नमाज पठण केले. वाढती गर्दी लक्षात घेऊन गोल्फ क्लब परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV