
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांची १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता केली जात आहे. डिसेंबरमध्ये संचमान्यता पूर्ण होणे अपेक्षित होती, पण अजूनही माध्यमिक विभागाकडील दोन हजारांहून अधिक शाळांची संचमान्यता अंतिम झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. त्यामुळे समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या आणि नवीन शिक्षक भरतीसाठी जुलै उजाडणार आहे.सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळांसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६३ हजार शाळा आणि १७ हजार खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता सुरू आहे. संचमान्यतेच्या नव्या निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात प्रत्येकी २० विद्यार्थ्यांचे बंधन आहे, अन्यथा तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. हा निकष बदलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली, पण त्यावरील अंतिम निर्णय कागदावर आलेला नाही. त्यामुळे देखील संचमान्यता अंतिम होण्यास विलंब होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड