
बीड, 21 मार्च (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी सहवेदना दिवस पाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती आदर व सहवेदना व्यक्त करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालती करपे यांनी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेला यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली असून, ती शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद म्हणून ओळखली जाते. नॅशनल क्राईम रेकॉईसच्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे ४५, तर महाराष्ट्रात सुमारे १५ शेतकरी आत्महत्या करतात. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २५६ आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे नरभक्षी शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेला जाब विचारण्यासाठी व शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचविण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis