
ठाणे, 21 मार्च (हिं.स.)। ठाण्याच्या कोपरीतील संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी लोकपरंपरेच्या रंगांची अनोखी उधळण झाली. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित चैत्र नवरात्रौत्सवात श्री अंबे मॉ चरणी आगरी-कोळी संस्कृतीचा साज चढला. अविनाश काबाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांच्यासह नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या ‘आगरी कोळी बाणा’ या बहारदार गीत-संगीत-नृत्य कार्यक्रमाने पारंपरिक ठेक्यावर रसिक भाविकांना थिरकायला भाग पाडले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची विशेष उपस्थिती होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चैत्र नवरात्रौत्सवात शुक्रवारी आगरी-कोळी परंपरेचा सुरेल आणि रंगतदार अविष्कार पाहावयास मिळाला. कोपरीच्या संत तुकाराम मैदानात पार पडलेल्या ‘आगरी-कोळी बाणा’ या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. नामवंत कलाकार अविनाश काबाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांनी आगरी-कोळी संस्कृतीची झलक गीत, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून सादर केली. नारळी पौर्णिमेपासुन विविध सणासुदीत गाजलेली गाणी तसेच कोळीवाड्यातील २१ दिवसीय गणेशोत्सवाचे गीतातून वर्णन केले. पारंपरिक कोळी गीतांपासून ते १९७०-८० च्या दशकातील मी डोलकर... यासारख्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सुशीलकुमार यांनी कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत निवेदन करताना सण-उत्सवांचे महत्त्व तसेच साडेतीन शक्तीपीठांचा महिमा रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडला. एकंदरीत आगरी-कोळी परंपरेच्या सुरावटींनी चैत्र नवरात्रौत्सवात सांस्कृतिक उर्जा आणि आनंदाची उधळण केली.
तत्पूर्वी, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या हस्ते देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना सचिव संजय मोरे, ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* *लतावहिनींचा उत्स्फूर्त फेर ; महिलांचाही जल्लोष*
उत्तरोत्तर रंगलेल्या ‘आगरी कोळी बाणा’ कार्यक्रमात ‘यळकोट यळकोट खंडेरायाचा’, ‘वेसावची पारू’ यांसारख्या गाजलेल्या कोळी गीतांवर महिलांनी सभामंडपातच उत्स्फूर्तपणे फेर धरला. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लतावहिनी एकनाथ शिंदे यांनीही कोळी गीतांच्या पारंपरिक तालावर फेर धरत कार्यक्रमात रंग भरला. त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
* *गोव्यात जन्मले पण महाराष्ट्राने घडवले - वर्षा उसगावकर*
“महाराष्ट्राची संत परंपरा आणि संस्कृती अतुलनीय आहे. एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे दोघेही पितापुत्र राज्यासाठी कार्यरत असून, संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा परिवार आहे. हा समृद्ध महाराष्ट्र आपण जपला पाहिजे. मी जरी
गोव्यातून आले असले तरी महाराष्ट्राने माझे स्वप्न पुर्ण केले, महाराष्ट्राच्या मातीशी माझे जुळलेले हे सुर आयुष्याच्या अखेरपर्यत असेच राहु दे, हीच देवीचरणी प्रार्थना केल्याचे वर्षा उसगावकर म्हणाल्या. कुटुंबाची चिंता वाहता वाहता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य करतो असे सांगुन त्यांनी, हेल्थ लॉस्ट...एव्हरीथिंग इज लॉस्ट ! हा संदेश उपस्थित रसिकांना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर