
रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा आज केली. येत्या २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात शानदार समारंभात पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
मंडळाचा कै. सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार प्रा. डॉ. मीनल ओक (चिपळूण), सौ. अर्चना गाडगीळ (राजापूर) आणि सौ. वैशाली पटवर्धन (रत्नागिरी) यांना जाहीर झाला आहे. साडी, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार सौ. मीरा नाटेकर यांना प्रदान करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार चिपळूणमधील आशीष महाजन व माखजन येथील परमेश्वर धामणकर यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी ४५०० रुपये व पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समशेरबहाद्दर पुरस्कार शिवणी (सांगली) येथील कॅडेट प्रणय पवार आणि पन्हाळा (कोल्हापूर) येथील कॅडेट सुयश चव्हाण यांना प्रत्येकी ३५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार स्वानंद बर्वे याला व कै. आनंदाबाई त्रिविक्रम केळकर विद्यार्थिनी वसतिगृहातील वेदश्री बापट हिला देऊन सन्मानित केले जाणार आहे. जीवनगौरव पुरस्कार संगमेश्वरचे माजी आमदार रवींद्र माने यांना व सेवा गौरव पुरस्कार चांदेराई येथील डॉ. श्यामसुंदर मोरे यांना आणि कार्यगौरव पुरस्कार नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांना देण्यात येणार आहे.
याखेरीज नगरसेविका सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मेधा कुळकर्णी, चिंचखरी येथील प्रगतिशील शेतकरी हेमंत फाटक, सीए सौरभ लेले, सीए प्रणव दामले, प्रगतिशील शेतकरी व ५० वर्षे दुग्ध व्यवसाय पूर्ण करणारे उंबरवाडी-कोतवडे येथील माधव भावे, शृंगेरी येथे भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांकप्राप्त पुण्यातील २७ वर्षीय सीए सौ. स्नेहा लिमये यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. वर्धापनदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मंडळातर्फे लोकमान्य टिळक पारितोषिक कै. केशव जोशी व कै. सौ. सुलोचना जोशी, प्रकाश देवधर, कै. आशा देवधर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंडळाच्या सभासद व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांची माहिती - कै. सुधा बडे पुरस्कार विजेत्या डॉ. मीनल ओक - या पर्यटन विषयात विद्यावाचस्पती पदवीप्राप्त आहेत. पर्यटन व कोकणच्या खाद्यसंस्कृतीवर त्यांनी व्याख्याने दिली असून विविध पर्यटन संस्थांच्या जिल्हाध्यक्ष आहेत. सौ. अर्चना गाडगीळ राजापूरमध्ये खाणावळ व्यवसाय गेली अनेक दशके करत आहेत. सासूबाईंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलाचा सांभाळ करून त्याच्यात खूप सुधारणा करणाऱ्या सौ. वैशाली पटवर्धन वैज्ञानिक डॉ. राजूल वासा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मेंदूबाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी त्या मेहनत घेत आहेत.
संस्कृतप्रेमी मीरा नाटेकर संस्कृत स्तोत्रांचे पठण करून तोंडपाठ करतात. जून २०२५ मध्ये शृंगेरी येथे भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. दुर्गा सप्तशतीचे शेकडो पाठ त्यांनी केले आहेत. २५ वर्षे स्वानंद पठण मंडळात संस्कृत स्तोत्रांचे नैमित्तिक पठण करतात.
चिपळुणातील तोंडली-वरेली सीमेवर राहणारे ५५ वर्षीय आशीष महाजन यांनी पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी अदम्य साहस दाखवत झुंज दिली. ऑक्टोबर २०२५ मध्ये ही घटना घडली. त्यांच्या या धाडसी कृतीबद्दल स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. माखजन येथील परमेश्वर धामणकर वीजपुरवठा नियमित करणारे दूत आहेत. ऊन, थंडी, पावसातही विद्युत वाहिनीवर येणाऱ्या फांद्या तोडून ते वीजपुरवठा सुरळित करतात. जिवावर बेतणाऱ्या प्रसंगातही जिद्दीने व प्रामाणिकपणे काम करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनाही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
तासगावच्या गुरुदेव दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील बारावीत शिकणारा प्रणय पवार आणि सुयश चव्हाण हे दोघेही सर्वोत्कृष्ट कॅडेट आहेत. हे दोघेही फुटबॉल, क्रिकेट व खो-खो खेळतात. प्रणयचे आयएएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न असून सुयशने भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले आहे.
जीवनगौरव पुरस्कार विजेते संगमेश्वरचे माजी आमदार रवींद्र माने १९८५ पासून शिवसेनेत तालुकाप्रमुख पदापासून कार्यरत आहेत. तीन वेळा ते संगमेश्वरचे आमदार होते. १९९५ ते ९९ या काळात नियोजन, अर्थ, पाणीपुरवठा व पाटबंधारे राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. प्रबोधन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मीनाताई ठाकरे विद्यालयाची स्थापना, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, मानेज् इंटरनॅशनल स्कूल सुरू केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी