
मुंबई, 22 मार्च (हिं.स.) - आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
दत्ताभाऊ प्रदीर्घ काळ राजकारणात होते. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री अशी अनेक सन्माननीय पदे भूषविली. राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून गरीब, सामान्य माणसाचे कल्याण केले पाहिजे, हे संस्कार त्यांनी आम्हा सर्वांना दिले. शाळा तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांनी असंख्य गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण दिले. गरीब मुला- मुलींचे लग्न लावून दिले. गरिबांचे संसार उभारले.
दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. त्यांच्या दारात आलेला प्रत्येक दुःखी माणूस आनंद घेऊनच परत गेला. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आयुष्यभर गरिबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळेच त्यांना सर्वजण श्रद्धेने ‘ दाताभाऊ‘ म्हणायचे.
दातृत्व आणि करूणेचे मूर्तिमंत रूप असलेल्या दत्ताभाऊंच्या निधनाने मी माझा कुटुंबप्रमुख गमावला आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या व कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती!
- चंद्रशेखर बावनकुळे
महसूल मंत्री आणि पालकमंत्री नागपूर- अमरावती जिल्हा
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी