
नागपूर, 22 मार्च (हिं.स.) - ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परिवारास आणि सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी