मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! - भरतशेठ गोगावले
* सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती ! सातारा, २२ मार्च (हिं.स.) : मंदिरे सुरक्षित तर धर्म सुरक्षित ! मंदिर महासंघाने एकत्र येऊन मंदिरांची जी वज्रमूठ बांधलेली आहे, तिला सरकाचे पूर्ण पाठबळ असे
भरतशेठ गोगावले


* सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !

सातारा, २२ मार्च (हिं.स.) : मंदिरे सुरक्षित तर धर्म सुरक्षित ! मंदिर महासंघाने एकत्र येऊन मंदिरांची जी वज्रमूठ बांधलेली आहे, तिला सरकाचे पूर्ण पाठबळ असेल. मंदिरांसाठी जमिनी खरेदी करतांना अथवा हस्तांतरण करतांना मुद्रांत शुल्कात सवलत मिळावी, ही मंदिरांची मागणी योग्य असून त्यावर अर्थ विभागाशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल! मंदिरांच्या जमिनी बळकावणार्‍यांना चाप लावण्यासाठी शासन ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायद्याच्या धर्तीवर अधिक कठोर पावले उचलण्याचा विचार करत आहे. या परिषदेत जे ठराव होतील, तसेच मंदिरांच्या ज्या ज्या मागण्या असतील, समस्या असतील त्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक बोलावून सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली.

महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्चला सातारा येथील स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता, सातारा येथे चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून ११०० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्‍वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी झाले होते.

मंदिरांचा पैसा हिंदूंच्याच कल्याणासाठी वापरला जावा; मंदिराची एक इंचही भूमी ‘वक्फ’च्या कह्यात राहू देणार नाही ! - सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर महासंघाने १७ सहस्र मंदिरांचे संघटन उभे केले असून मंदिर महासंघ हा मंदिरे आणि सरकार यांच्यामधील दुवा आहे. राज्यातील मंदिरांच्या भूमी लाटण्याचे षडयंत्र उघड झाले असून ती भूमी परत मिळण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. सोमेश्‍वर मंदिरांची ५० कोटी रुपये रुपयांची भूमी केवळ ९६० रुपयांना विकली गेली. असे अनेक प्रकार उघडकीस येत असून असे प्रकार यापुढे आम्ही सहन करणार नाही. हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरांच्या १०० मीटर परिघात मद्य आणि मांस विक्रीची दुकाने असता कामा नयेत, अशी भूमिका असून ही मर्यादा वाढवून किमान ५०० मीटर करावी. ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात असलेली लाखो एकर भूमी ही हिंदूंचा हक्क हिरावून घेणारी आहे. केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केल्या; मात्र मंदिरांची हजारो एकर भूमी अद्यापही वक्फच्या कह्यात आहे. तरी यापुढील काळात एक इंचही भूमी ‘वक्फ’च्या कह्यात राहू देणार नाही असा ठाम निर्धार मंदिरांनी केला पाहिजे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी या प्रसंगी केले.

मंदिरे सुरक्षित राहिली, तरच देव, देश आणि धर्म सुरक्षित ! - योगी निरंजननाथ महाराज

आपण सर्वजण मंदिराचे विश्‍वस्त, देवतांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत, एकत्र आले आहोत, हीच या मंदिर न्यास परिषदेची संजीवनी आहे. मंदिरे सुरक्षित राहिली, तरच देव, देश आणि धर्म सुरक्षित राहील. मंदिरांचे सरकारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे प्रत्येक विश्‍वस्ताने त्यांच्या मंदिरांविषयी सजग राहिले पाहिजे. मंदिराचे आर्थिक व्यवहार हे पारदर्शक असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, नियोजन, भक्तीभाव यांसाठी आषाढी वारी हे देशात सर्वात मोठी आहे. कोरोना काळाप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये निरंतर अन्नदान केले जाते. त्यामुळे मंदिरे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत हे त्याचे सडेतोड उत्तर आहे.

या प्रसंगी ‘समाजातील मंदिर अर्थव्यवस्थेचे महत्त्व’ यावर बोलतांना श्री. संदीप सिंह म्हणाले ‘‘जगातील अनेक मोठी शहरे कारखान्यांमुळे उभी राहिली आणि कारखाने बंद पडताच ती नष्ट झाली; मात्र अयोध्या, काशी, उज्जैन आणि तिरुपती यांसारखी शहरे सहस्रो वर्षांपासून केवळ मंदिरांमुळे जिवंत आहेत.

भारतातील मंदिरे विकासांचे स्रोत (डेव्हलपमेंट हब) आहेत ! - गिरीष शहा, मंदिर अभ्यासक

भारतातील मंदिरे विकासांचे स्रोत (डेव्हलपमेंट हब) आहेत. मंदिर आणि गोशाळा एकत्र आले, तर भारताचा विकासाचा स्तर पालटू शकतो. आज समाजामध्ये शेण आणि गोमूत्रापासून ३०० हून अधिक उत्पादने निर्माण झाली आहेत. मंदिरांशी युवकांना जोडले पाहिजे. मंदिरांच्या माध्यमातून सेवा, आरोग्य, निसर्गाचे जतन आणि संवर्धन होऊ शकते. मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांना अर्थसाहाय्य केले पाहिजे. मंदिरे ही राष्ट्रनिर्मितीची केंद्रे आहेत.

मंदिरात येणार्‍या भक्तांना धर्मशिक्षित करण्याचे दायित्व मंदिरांनी घेतले, तर रामराज्य दूर नाही ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

प्राचीन काळापासून मंदिरे ही कला, संस्कृती समाज आणि अर्थ यांच्यासह मंदिरे ही धर्माशिक्षणाची केंद्रे होती. मंदिरांच्या माध्यमातून समाजाला एकसंध ठेवण्याची प्रक्रिया होत आहे. हिंदू समाजाचे जन्महिंदूपासून म्हणून कर्महिंदूंपर्यंत रूपांतरण करण्यासाठी मंदिर हे प्रभावी माध्यम आहे. आता मंदिर आणि तीर्थक्षेत्रांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला असता आणि तीर्थक्षेत्रे आज पर्यटन स्थळ झाले आहेत. देवाला योग्य प्रकारे नमस्कार कसा करावा हेही हिंदूंना शिकवण्याची वेळ आली असून तीर्थक्षेत्रांचा पूर्ण लाभ आपण करून घेत नाही. त्यामुळे मंदिरात येणार्‍या भक्तांना धर्मशिक्षित करण्याचे दायित्व मंदिरांनी घेतले, तर रामराज्य दूर नाही.

उपस्थित मान्यवर - श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे, ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प विठ्ठल स्वामी वडगावकर, स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थाचे पू. उदय शेकडे, ह.भ.प. पुरुषोत्तम कुलकर्णी, दत्त मंदिर पळशी येथील पू. जगदीश पिसाळ महाराज, श्री विशाल महाराज पाटेश्‍वर, रत्नागिरी येथील पतंजली योग समितीचे अधिवक्ता विद्यानंद जोग, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, श्री हनुमान मंदिर नॉर्दन ब्रॅच’चे श्री. विलास पुंड, अकोला येथील पुरातन महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. अमल मलगुंडे, रेणवसिद्ध मंदिर येथील, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी येथील विश्‍वस्त भरत पाटील, मिरज (जिल्हा सांगली) संस्थानचे प्रतिनिधी श्री. अवधूत बोडस, यवतमाळ येथील ‘श्री महादेव मंदिर मणदेव’चे अध्यक्ष श्री. अशोक खोडकुंभे, अमरावती येथील श्री नागेश्‍वर महादेव संस्थान धामंत्रीचे अध्यक्ष श्री. कैलास पनपालिया, कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष श्री. अतुल ठाकरे

परिषदेतील विशेष घडामोडी : हिंदू सोडून अन्य कुणालाही देवस्थानच्या यात्रांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावचे सरपंच आणि श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय मरकड यांचा, तसेच शनिशिंगणापूर येथील श्री. ऋषिकेश शेटे यांचा शनिशिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचार उघड केल्याविषयी विशेष सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande