
नाशिक, 22 मार्च, (हिं.स.)। निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी जनकल्याणासाठी सुरू केलेल्या विविध परंपरा समाजासाठी वरदानकारी असून जपानुष्ठाना सारख्या प्रभावशाली व अद्विय परंपरेमुळे संस्कारक्षम व व्यसनमुक्त समाज घडवण्याचे महान कार्य होत आहे. असे प्रतिपादन अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी केले.
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी अथक प्रयत्नातून जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला.याच पुण्यभूमीत बाबाजींचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या पर्वकालावर आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या प्रसंगी उपस्थितांना जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी मार्गदर्शन विशेष मार्गदर्शन केले.आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, श्रमदान,भागवत वाचन, ध्यान, प्राणायाम आदी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात सुरू आहे.सोहळ्यादरम्यान दररोज पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी, दुपार व सायंकाळी विधीपाठ, महाआरती व सत्संगाचे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत रोज जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे विशेष मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे.
कार्यक्रमाची सांगता २६ मार्च रोजी होणार असून यावेळी पालखी मिरवणूक,सत्संग,महाआरती,संत, अतिथी व ब्राम्हण पूजन संपन्न होणार आहे. धर्मसोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवार,श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV