
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या धर्तीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रात ‘कूल रूफ योजना’ तातडीने राबविण्याची मागणी गटनेते निलेश देव यांनी केली आहे.
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर, वीज वापरावर तसेच दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अमरावती महानगरपालिकेने ‘कूल रूफ’ उपनियम लागू करून नागरिकांना दिलासा देण्याचा उपक्रम सुरू केला असून, त्याच धर्तीवर अकोल्यातही ही योजना राबवावी, असे त्यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या योजनेमुळे घरातील तापमान कमी होण्यास मदत होईल, ऊर्जा बचत होईल तसेच पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावित योजनेत पात्र इमारतींना ‘कूल रूफ’ प्रमाणपत्र देणे, निवासी व शासकीय इमारतींना मालमत्ता करात १० टक्के (३ वर्षांसाठी) सवलत देणे, व्यावसायिक इमारतींना ५ टक्के सवलत देणे, तसेच इमारतींच्या उष्णता प्रतिरोधकता व ऊर्जा कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्याचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच ‘कूल रूफ’ साठी छतावर परावर्तक रंग लावणे, कूल टाइल्स किंवा मोझॅक टाइल्स बसवणे, ब्रिक बॅट कोबा तंत्राचा वापर करणे, सोलर पॅनल बसविणे आणि टेरेस गार्डन विकसित करणे यांसारख्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
ही योजना अकोल्यात राबविल्यास उष्णतेवर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊन पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरनिर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल, असा विश्वास निलेश देव यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे